दुबई - आयसीसीने नो बॉलविषयी एक नवा नियम तयार केला आहे. त्या नियमानुसार नो-बॉलचा निर्णय देण्याची जबाबदारी आता तिसऱ्या पंचांवर असणार आहे. नो बॉल देताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये, यासाठी आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. आयसीसीने हा नियम २१ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या महिला टी-२० विश्व करंडक स्पर्धेत लागू केला आहे.
आयसीसीने याआधी नो-बॉलच्या निर्णयासंदर्भातील प्रणालीचा प्रायोगिक तत्वावर वापर भारत विरुद्ध वेस्ट इंडीज मालिकेत केला होता. त्यानंतर आता आयसीसीच्या महिला टी-२० विश्व करंडक स्पर्धेत हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.
काय होणार बदल -
आयसीसीच्या नव्या नियमानुसार नो बॉल आता मैदानातील पंच देणार नाहीत. याची जबाबदारी तिसऱ्या पंचावर असणार आहे. तिसरे पंच टीव्हीवर पाहून नो बॉल असल्याचे मैदानातील पंचांना कळवतील. त्यानंतर मैदानातील पंच त्या चेंडूला नो बॉल ठरवतील.
दरम्यान नो बॉलवरुन मागील काही काळात पंच, कर्णधार आणि खेळाडूंमध्ये वादविवाद पाहायला मिळाले आहेत. यामुळे आयसीसीने हा नवा नियम बनवला आहे.
आयसीसीकडून याविषयी सांगण्यात आले की, '१२ सामन्यात नो बॉल विषयीच्या नव्या प्रणालीचा वापर करण्यात आला. यात ४७१७ चेंडू तिसऱ्या पंचांनी टीव्हीवर तपासले. तेव्हा त्यात त्यांना १३ चेंडू नो बॉल असल्याचे दिसून आले. अचूक निर्णयासाठी या प्रणालीचा वापर केला जाणार आहे.'
हेही वाचा - U-१९ विश्व करंडकाच्या अंतिम सामन्यात राडा; दोन भारतीयासह पाच जण दोषी
हेही वाचा - IND vs NZ : भारताचे न्यूझीलंडसमोर २९७ धावांचे आव्हान, राहुलची दमदार शतकी खेळी