साऊथम्प्टन - आयसीसीने नव्याने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीतील गोलंदाजांच्या यादीत इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांना फायदा झाला आहे. पाकिस्तानविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत चार बळी घेणारा ब्रॉड एका स्थानाने वर चढून दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. तर, अँडरसनने १४ वे स्थान मिळवले आहे.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बासलाही दोन स्थानांचा फायदा झाला असून तो आठव्या स्थानावर पोहोचला आहे. तर, भारताचा यॉर्करकिंग जसप्रित बुमराह एका स्थानाने घसरून नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
फलंदाजांच्या क्रमवारीत बाबर आझमने कारकीर्दीतील सर्वोत्तम पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये बाबर पाचव्या स्थानी होता. आझमचा सहकारी अबिद अली ४९ व्या आणि मोहम्मद रिझवान ७५ व्या स्थानावर आहे.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंड २७९ गुणांसह तिसर्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तान १५३ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. भारत ३६० गुणांसह अव्वल, तर ऑस्ट्रेलिया २९६ गुणांसह दुसर्या क्रमांकावर आहे.