मेलबर्न - कोरोनामुळे जुलै महिन्यात आयोजित असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसह जगभरातील जवळपास सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. पण, ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणारी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा नियोजित वेळत सुरू होईल, असा विश्वास आयोजकांचा आहे.
यंदाची आयसीसी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित आहे. ही स्पर्धा १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या पाच आठवड्याच्या कालावधीमध्ये पार पडणार आहे. पण यावर कोरोनाचे सावट आहे. असे असताना विश्वकरंडक समितीचे मुख्य कार्यकारी आधिकारी निक हॉक्ले यांनी स्पर्धा नियोजित वेळानुसार होईल, असे म्हटलं आहे.
एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, निक हॉक्ले म्हणाले की आम्ही टी-२० विश्वकरंडक स्पर्धा नियोजीत वेळेत सुरूवात करून ती यशस्वी करण्यासाठी सर्वश्रेष्ठ प्रयत्न करत आहोत. आम्हाला आशा आहे की, ही स्पर्धा नियोजित वेळेनुसार होईल. आम्हा सर्व बाबींवर नजर ठेऊन आहोत.
पुढे बोलताना ते म्हणाले, 'आम्ही या संदर्भात आयोजन समिती, आयसीसी आणि स्पर्धेसंबधातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहोत. आवश्यक बदल असल्यास तो आम्ही करू. अद्याप या स्पर्धेला सात महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. आयसीसीने याआधीच स्पष्ट केलं आहे की, स्पर्धा स्थगित करण्याचा काही प्रश्नच नाही. ती वेळेवर सुरू होईल.
दरम्यान, कोरोनामुळे जगात ७४ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ऑस्ट्रेलियातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया सरकारने ६ महिन्यासाठी विमानसेवा बंद करत संपूर्ण देश लॉकडाऊन केला आहे.
हेही वाचा - आफ्रिदी सायमंडला म्हणाला.. फक्त लांब षटकार मारणारा कोण? हे दाखवत आहे, पाहा व्हिडिओ
हेही वाचा - खुशखबर!..7 एप्रिलपासून होणार क्रिकेट सुरू..भारत सरकारचा निर्णय