दुबई - कोरोनाच्या संकटात क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या असताना ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाने भारतीय संघाला मोठा धक्का दिला आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला पछाडत अव्वलस्थान पटकावले आहे. २०१६ नंतर भारताला कसोटीतील अव्वलस्थान गमवावे लागले आहे. पण, जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे.
आयसीसीने आज (शुक्रवार) ताजी कसोटी, टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमधील संघांची क्रमवारी जाहीर केली. यात कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने अव्वलस्थान काबीज केलं आहे. त्यांच्या खात्यात ११६ गुण जमा आहे. तर न्यूझीलंड (११५) आणि भारत (११४) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, आयसीसीने मे २०१९ नंतर खेळलेल्या सामन्यांतून १०० टक्के आणि त्यापूर्वीच्या दोन वर्षांतील कामगिरीच्या ५० टक्के गुणांची बेरीज करून ताजी क्रमवारी ठरवली आहे.
टी-२० क्रिकेटमध्येही ऑस्ट्रेलियाचा संघच किंग ठरला आहे. त्यांनी मागील २७ महिन्यांपासून अव्वलस्थानी असलेल्या पाकिस्तानला मागे टाकत अव्वलस्थान काबीज केले आहे. ऑस्ट्रेलिया २७८ गुणांसह टॉपला आहे. इंग्लंड (२६८) आणि भारत (२६६) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तान २६० गुणांसह आता चौथ्या स्थानावर घसरला आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंड अव्वलस्थानी आहे. त्याचे १२७ गुण आहेत. तर या यादीत भारत ११९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड (११६) आणि दक्षिण आफ्रिका (१०८) अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलिया या क्रमवारीत १०७ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा - 'जय महाराष्ट्र..!' सचिन तेंडुलकरने दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
हेही वाचा - शमी, बुमराह क्रूर गोलंदाज, ते नेट सरावात फलंदाजाचे डोकं फोडण्यासाठी प्रयत्न करतात - रोहित शर्मा