लंडन - केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेच्या नवव्या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशवर २ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडच्या संघाने विश्वकरंडक स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.
या स्पर्धेत आतापर्यंत न्यूझीलंडने २ सामने खेळले असून त्यातील दोन्ही सामने जिंकण्यास त्यांना यश आले आहे. त्यामुळे ४ गुणांसह न्यूझीलंडने गुणतालिकेत पहिल्या स्थानी विराजमान आहे. तर बुधवारी खेळल्या गेलेल्या आपल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ६ गडी राखून विजय मिळवणारा भारतीय संघ २ गुणांसह पाचव्या स्थानी आहे.
या गुणतालिकेत शेवटच्या म्हणजे १० व्या स्थानी अफगाणिस्तानचा तर नवव्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे. दोन्ही संघाना आतापर्यत एकही सामना जिंकता आलेला नाही. या स्पर्धेत आतापर्यत अफगाणिस्तानने २ तर दक्षिण आफ्रिकेने ३ सामने खेळले आहेत.