नवी दिल्ली - कोरोनामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजनात कोणताही फेरबदल झालेला नाही आणि आंतरराष्ट्रीय नियोजनानुसार ही प्रक्रिया सुरू असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पष्ट केले आहे.
या स्पर्धेची पहिली आवृत्ती मार्च 2021 मध्ये संपणार आहे. यावेळी सर्व नऊ संघ दोन वर्षांत एकूण सहा कसोटी मालिका खेळतील. त्यापैकी तीन कसोटी घरच्या मैदानावर तर तीन तसोटी विदेशी खेळपट्टीवर खेळवण्यात येतील.
त्यानंतर, पहिल्या दोन संघांमध्ये 20 जूनला इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर अंतिम सामना खेळवण्यात येईल. आयसीसीने स्पष्टीकरण दिले आहे, की या क्षणी आपली प्राथमिकता पुढे ढकलण्यात आलेल्या सहा मालिका आयोजित करणे आहे. श्रीलंका विरुद्ध इंग्लंड, पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आणि बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका पुढे ढकलण्यात आली आहे.
या स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत पहिल्या, ऑस्ट्रेलिया दुसर्या आणि इंग्लंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचे 360, ऑस्ट्रेलियाचे 296 आणि इंग्लंडचे 226 गुण आहेत. न्यूझीलंड 180 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. तर, पाकिस्तान 140 गुणांसह पाचव्या, श्रीलंका 80 गुणांसह सहाव्या, वेस्ट इंडीज 40 गुणांसह सातव्या आणि दक्षिण आफ्रिका 24 गुणांसह आठव्या स्थानी आहे.