नवी दिल्ली - भारतीय कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या स्टीव्ह स्मिथ, जो रूट आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन यांच्यापेक्षाही वरचढ आहे. याचे कारण म्हणजे क्रिकेटच्या तिन्ही प्रारूपांमध्ये त्याचे विक्रम या सर्वांपेक्षा उत्तम आहेत, असे ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी म्हटले. चॅपेल यांनी राधाकृष्णन श्रीनिवासन यांच्या कार्यक्रमात आपले मत दिले.
चॅपेल म्हणाले, ''या गटात कोहली सर्वोत्कृष्ट आहे (स्मिथ, रूट, विल्यमसन, कोहली) यात प्रश्नच उद्भवत नाही. तिन्ही प्रारूपांमधील त्याचे विक्रम अविश्वसनीय आहेत. जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात होता, तेव्हा आम्ही त्याची मुलाखत घेतली होती. विशेषत: टी-20 क्रिकेटमध्ये रचनात्मक आणि फॅन्सी शॉट्स का खेळत नाही, हे त्याने स्पष्ट केले."
चॅपेल पुढे म्हणाले, "विराटने सांगितले की आताची फलंदाजी खराब व्हावी अशी त्याची इच्छा नाही. मी ज्या छोट्या फॉर्मॅटमध्ये खेळलो आहे, त्यामध्ये व्हिव्ह रिचडर्स सर्वोत्तम होता. तो सामान्य शॉट खेळत असे. पण तो चेंडूला अचूक खेळायचा. तो खूप वेगात धाव घ्यायचा. विराटचेही तसेच आहे. तो पारंपारिक पद्धतीने खेळतो."