नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामावर कोरोनाचे सावट आहे. या स्पर्धेवर भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीचे भवितव्य अवलंबून होते. मात्र, आता धोनीची वेळ संपली असल्याचे मत प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी मांडले आहे.
‘महेंद्रसिंह धोनीचे पुन्हा एकदा भारताकडून खेळण्याचे स्वप्न संपले आहे, असे मला वाटते. मला वाटत नाही की यावर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकात धोनी खेळू शकेल’, असे भोगले यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
कोरोना व्हायरसच्या हाहाकारामुळे जगातील सर्व मोठ्या स्पर्धा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. क्रिकेटमधील श्रीमंत असलेली आयपीएलही यंदा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सर्वांना प्रतीक्षा असलेले महेंद्रसिंह धोनीचे पुनरागमनही लांबणीवर गेले आहे. या स्पर्धेवर धोनीचे भवितव्य अवलंबून होते.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. या स्पर्धेसंदर्भात बीसीसीआय आणि आठही फ्रँचायझी मालकांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक होणार होती. पण ती रद्द करण्यात आली होती.