मुंबई - भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर रोहित शर्मा आता दुखापतीतून सावरला आहे. तो लॉकडाऊन संपल्यानंतर लवकरच मैदानात उतरण्यासाठी उत्सुक आहे. पण, त्याला भारतीय संघात परतण्यासाठी फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. या टेस्टमध्ये पास झाल्यानंतरच त्याला भारतीय संघात पुन्हा स्थान मिळेल.
काही दिवसांपूर्वी रोहितने फेसबुकच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना सांगितलं की, 'लॉकडाऊन पूर्वीच मी क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी पूर्णपणे सज्ज झालो होतो. माझी फिटनेस टेस्ट होणे बाकी होती. अशात लॉकडॉऊनची घोषणा झाली. आता हा लॉकडाऊन संपल्यानंतर मी एनसीएमध्ये जाऊन फिटनेस टेस्ट देईन. त्यानंतर मी सरावाला सुरुवात करणार आहे.'
दरम्यान, रोहित शर्माला फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंड दौऱ्यात दुखापत झाली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पाचव्या सामन्यात विराटच्या जागी रोहित शर्मा नेतृत्वाची जबाबदारी पार पाडत होता. या सामन्यात त्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याने उर्वरित दौरा मध्येच सोडत मायदेश गाठले होते.
कोरोना महामारीत केंद्र सरकारने देशातील मैदाने व स्पोर्टस कॉम्पलेक्स खेळाडूंना सरावासाठी सुरू करण्याची परवानगी दिली आहे. पण, यासाठी खेळाडूंना काही अटी व नियम घालून दिले आहे. याशिवाय क्रिकेटपटूंसाठी आयसीसीने व बीसीसीआयनेही काही दिशानिर्देश जारी केले आहे. याचे पालन करुन शार्दुल ठाकूरने आऊटडोर ट्रेनिंग सुरू केली आहे. लॉकडाऊनमध्ये आऊटडोअर ट्रेनिंग करणारा शार्दुल भारताचा पहिला क्रिकेटपटू ठरला. पण, शार्दुलने सरावाला सुरुवात करण्याआधी बीसीसीआयची परवानगी घेतलेली नाही. यामुळे बीसीसीआय शार्दुलवर नाराज असल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भातील वृत्त आयएएनएसने दिले आहेत.
हेही वाचा - खेळाडूंचा सराव : आयसीसीची मार्गदर्शकतत्त्वे, चार टप्प्यांत सराव सत्राच्या आयोजनाचा सल्ला
हेही वाचा - सरावाला सुरुवात : शार्दुल ठरला आऊटडोअर ट्रेनिंग करणारा भारताचा पहिला क्रिकेटपटू