लंडन - विश्वकरंडक स्पर्धेला सुरुवात झाली असून अनेक खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. असाच एक खेळाडू म्हणजे भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात हार्दिकने २७ चेंडूत ४८ धावांची वादळी खेळी केली होती. त्याच्या या खेळीनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू स्टीव्ह वॉने हार्दिकची तुलना दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू लान्स क्लुसनरशी केली आहे.
स्टीव वॉ म्हणाला की, 'हार्दिकची फलंदाजी आणि गोलंदाजीची शैली ही क्लुसनरसारखी आहे. हार्दिकच्या वादळी फलंदाजीचा सामना कसा करावा, याचे उत्तर विरोधी संघातील गोलंदाजांकडे नसून तो या स्पर्धेत सर्वांवर भारी पडेल.'
वॉ पुढे बोलताना म्हणाला, हा मुलगा १९९९ साली चमकणाऱ्या क्लुसनरसारखा आहे. या मुलाकडे फलंदाजीची अशी शैली आहे, ज्याची तोड विरोधी संघातील कर्णधारांकडे नाहीय.
यापूर्वी झालेल्या आयपीएलमध्येही हार्दिकने त्याच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर साऱ्यांचीच मने जिंकली होती. त्याने आयपीएल २०१९ मध्ये १६ सामन्यांमध्ये १५ डाव खेळताना ४०२ धावा केल्या होत्या. त्यात कोलकाता नाईट रायडर्सविरूद्धच्या एका सामन्यात ३४ चेंडूत ९१ धावांची वादळी खेळीचाही समावेश होता.