मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात लोकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन सर्व स्तरातून करण्यात येत आहे. पण रोजंदारीवर काम करणारे मजूर आपापल्या गावाला जाण्यासाठी मिळेल त्या मार्गाने निघाले आहेत, यावर भारताचा फिरकीपटू हरभजनने चिंता व्यक्त केली. तो तो ANI वृत्तसंस्थेशी बोलत होता.
सध्याच्या घडीला देशाची राजधानी दिल्लीत आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे रोजंदारीवर काम करणारे मजूर आपापल्या गावाला जाण्यासाठी बस स्थानकांवर मोठ्या संख्येने गर्दी करुन उभे आहेत, यावर हरभजनने चिंता व्यक्त केली.
या विषयावर तो म्हणाला, 'कोणतीही घोषणा करण्याआधी सर्व घटक म्हणजे, रोजंदारीवर काम करणारे आणि इतर राज्यातील मजूरांचा विचार व्हायला हवा. कारण त्यांच्याकडे रहायला घर, खायला अन्न, प्यायला पाणी यासारख्या मुलभूत सुविधा नसतात. सरकारने या लोकांची काळजी घेऊन त्यांना विश्वास देणे गरजेचे आहे.'
दिल्लीच्या बसस्थानकांवरचे चित्र पाहणे हे वेदनादायी आहे, असेही हरभजन म्हणाला. याशिवाय त्याने क्रिकेट आणि आयपीएल विषयावरही भाष्य केलं.
तो म्हणाला, 'खरे सांगायचे तर सध्याच्या घडीला माझ्या मनात क्रिकेटचा विचारच आलेला नाही. देशासमोर क्रिकेट ही छोटी गोष्ट आहे. सध्या स्थितीत क्रिकेट महत्वाचे नाहीच आहे. देशात नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे ही गोष्ट सध्या गरजेची आहे. आताच्या घडीला मी क्रिकेट किंवा आयपीएलचा विचार केला तर स्वार्थी ठरेन. जर आपण सर्व सुखरुप आणि निरोगी राहिलो तरच कोणताही खेळ खेळू शकतो. क्रिकेटचा मी आता विचारही करत नाही.'
दरम्यान, भारतात कोरोना रुग्णांची संख्या १ हजाराहून अधिक झाली आहे. तर २७ जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे आयपीएलसह सर्व स्पर्धांवर अनिश्चिततेचे सावट आहे.
हेही वाचा - कोरोना : ऑस्ट्रेलिया 'बॉर्डर' बंद, टी-२० विश्वकरंडकासह भारताचा दौरा अडचणीत
हेही वाचा - “REAL WORLD HERO”, आयसीसीने केलं वर्ल्डकप’स्टार’चं कौतुक!