मुंबई - गुगल सर्च इंजिनमध्ये सद्या गडबड सुरू आहे. गुगलला काही विचारले असता, तो काहीतरीच उत्तर देत आहे. आता तर गुगलने चक्क आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणाऱ्या शुबमन गिलचे लग्नही करून टाकले. इतकेच नव्हे तर त्याने, शुबमनची पत्नी, भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरची लाडकी कन्या सारा तेंडुलकर असल्याचं जाहीर केलं आहे.
सद्या गुगलवर शुबमन गिलची पत्नी असे सर्च केले तर नाव येतं ते सारा तेंडुलकर. त्यामुळे गुगलचे नेमकं गंडलंय तरी काय? हा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही. मागील आठवड्यात गुगलने अशीच गडबड केली होती. त्याने विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशिद खानची पत्नी असल्याचा जावई शोध लावला होता. आता सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही शुबमन गिलची पत्नी आहे, असा नवा गोंधळ गुगलने घातला आहे. या प्रकारावरून नेटिझन्सनी गुगलला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.
दरम्यान, गुगल सर्च इंजिन जगभरात प्रसिद्ध आहे. वाचण्यात आलेले लेख, बातम्या यांचे रिझल्ट दाखवण्याचे काम गुगल करतो. पण त्याच्याकडे योग्य उत्तर देण्यासाठी कोणतेही सिस्टम नाही. एसईओचे एक्सपर्ट आलोक रघुवंशी यांनी सांगितलं की, गुगल स्वत: कोणताही उत्तर देऊ शकत नाही. तो उत्तर देण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंगसारख्या टूल्सचा वापर करतो.
शुबमन गिलची पत्नी सारा असल्याचा जावई शोध गुगलने कशाप्रकारे लावला -
शुबमनने काही दिवसांपूर्वी एक कार खरेदी केली होती. या कारचे फोटो त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले होते. शुबमनच्या या पोस्टवर सारा रिअॅक्ट झाली. यानंतर हार्दिक पांड्याने शुबमनची मस्करी केली. या प्रकरणानंतर शुबमन आणि सारा हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या पुढे आल्या. या बातम्या गुगल सर्चमध्ये टॉपवर होत्या. यावरून गुगलने साराला शुबमनची पत्नी असल्याचे जाहीर केलं.