नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने जगभरात धूमाकूळ घातला असून या व्हायरसने क्रीडाविश्वातही शिरकाव केला आहे. आज शनिवारी पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने स्वत: ला कोरोनाची लागण झाल्याचे उघड केले. त्यानंतर जगभरातून त्याच्या चाहत्यांनी तो ठीक व्हावा, म्हणून प्रार्थना केली. आता आफ्रिदीचा मैदानावरील कट्टर विरोधक असलेल्या गौतम गंभीरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभा खासदार असलेल्या गौतम गंभीरने आफ्रिदीला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गंभीर एका कार्यक्रमादरम्यान म्हणाला, ''या व्हायरसची लागण कोणालाही होऊ नये. आफ्रिदीशी माझे काही बाबतीत मतभेद आहेत, पण लवकरात लवकर तो बरा व्हावा अशी मी प्रार्थना करतो.''
या दोन खेळाडूंमधील मैदानावरील संघर्ष सर्वांनाच ठाऊक आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही या दोघांमधील मतभेद कमी झालेले नाही. कोरोनाची लागण झाल्याची माहिती आफ्रिदीने ट्विटरद्वारे दिली. गुरुवारपासून प्रकृती ठीक नसल्याचे त्याने सांगितले आहे.
40 वर्षीय आफ्रिदीने 2016 मध्ये आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. त्याने 20 वर्षाच्या करिअरमध्ये 27 कसोटी, 398 एकदिवसीय सामने आणि 99 टी-20 सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याने अनुक्रमे 1716, 8064, 1416 धावा केल्या आहेत. आफ्रिदीने आयपीएलमध्ये 10 सामने खेळले असून त्यात त्याने 81 धावा केल्या आहेत.