नवी दिल्ली - 2007मध्ये सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला होता, असा खुलासा भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी केला. कर्स्टन यांनी पुन्हा एकदा भारतासोबतच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. त्यांनी भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरशी असलेल्या खास संबंधाविषयी सांगितले.
कर्स्टन यांनी असे असेही उघड केले, की सचिन त्याच्या फलंदाजीच्या क्रमाविषयी खूष नव्हता आणि 2007 मध्ये त्याने आपली कारकीर्द संपवण्याचा विचार केला होता. 2007 मध्ये वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाला गट साखळीतूच बाहेर पडावे लागले होते.
कर्स्टन म्हणाले, "सचिनसोबतचा माझा कोचिंगचा प्रवास खूपच रम्य होता. मी जेव्हा भारतात आलो तेव्हा त्याने निवृत्ती घेण्याचा विचार केला. त्याच्या म्हणण्यानुसार, तो फलंदाजीच्या क्रमाविषयी खूष नव्हता, तो त्याच्या क्रिकेटचा अजिबात आनंद घेत नव्हता."
कर्स्टन यांनी मार्च 2008 मध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले. कर्स्टन भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना सचिनने 38 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1,958 धावा केल्या. यात सात शतकांचा (दुहेरी शतकासह) समावेश आहे. त्याचवेळी सचिनने 31 कसोटी सामन्यांमध्ये 12 शतके ठोकून 2910 धावा केल्या.
कर्स्टन पुढे म्हणाले, "तीन वर्षांनंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 शतके ठोकली. तो त्याच्या आवडत्या क्रमांकावर खेळला आणि आम्ही वर्ल्डकप जिंकला. खेळाडू चांगले प्रदर्शन करू शकतील असे वातावरण मी त्यांना दिले. मी सचिनला काहीही बोललो नाही. त्याला त्याचा खेळ माहित होता. त्याला फक्त वातावरणाची गरज होती. फक्त त्यालाच नाही तर संपूर्ण संघासाठी."
कर्स्टन हे भारताचे सर्वात यशस्वी प्रशिक्षक ठरले. त्यांच्या कारकिर्दीत संघाने 2009 मध्ये कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आणि दोन वर्षांनंतर विश्वकरंडकावर नाव कोरले.