कोलकाता - बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुली यांची बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या (कॅब) सचिवपदी निवड केली जाऊ शकते. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, ५ फेब्रुवारीला होणाऱ्या कॅबच्या सर्वसाधारण बैठकीत ही नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा - #HBDRahulDravid : पदार्पणाच्याच सामन्यात 'निवृत्त' झालेला एकमेव क्रिकेटपटू!
कॅबचे सचिव अविशेक दालमिया हे कॅबचे नवीन अध्यक्ष होऊ शकतात. त्यानंतर, स्नेहाशिष हे सचिवपद सांभाळतील. या दोघांची बिनविरोध निवड होईल, अशी माहिती या वृत्तपत्राने दिली आहे. कॅबमध्ये पदार्पण करणारे गांगुली कुटुंबातील स्नेहाशिष हे एकमेव नाहीत. त्यांचे काका देबाशिश आधीपासून असोसिएशनचे कोषाध्यक्ष आहेत.
स्नेहाशिष गांगुली यांनी बंगालकडून ५९ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आहेत. या सामन्यात ३९.५९ च्या सरासरीने त्यांनी २५३४ धावा केल्या आहेत. लिस्ट 'ए' मध्ये मात्र स्नेहाशिष आपली कामगिरी उंचावू शकले नाहीत. १८ सामन्यात त्यांनी फक्त २७५ धावा केल्या आहेत.