लाहोर - पाकिस्तानचा एकदिवसीय संघाचा कर्णधार बाबर आझम आणि भारतीय कर्णधार विराट कोहली यांच्या तुलनेवरूनन क्रिकेटविश्वात खूप चर्चा रंगत आहेत. आता या प्रकरणी पाकिस्तान संघाचा मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हकने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मिसबाह यूट्यूब चॅनेलवर म्हणाला, ''मला तुलना आवडत नाही. परंतु मला वाटते की या क्षणी बाबर विराट, स्टीव्ह स्मिथ आणि जो रूटच्या बरोबरीचा आहे. जर विराटच्या पुढे जायचे असेल तर, त्याला कठोर परिश्रम घ्यावे लागतील."
मिसबाह पुढे म्हणाला, "तो स्वत:च्या झोनमध्ये आहे. त्याला फक्त संघात रहायचे नाही, फक्त पैशासाठी खेळायचे नाही. त्याला पाकिस्तान संघात सर्वोत्तम काम करायचे आहे. कोहली आणि स्मिथ सारख्या अव्वल फलंदाजांमध्ये तो नेहमीच स्वत: ला शोधतो."
माझी आणि विराट कोहलीची तुलना करणे चुकीचे असल्याचे मत पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार बाबर आझमने दिले होते. बाबर हा एकदिवसीय क्रमवारीत तिसर्या तर कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. टी-20 क्रमवारीत बाबर अव्वल तर कोहली दहाव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर कसोटी क्रमवारीत कोहली दुसर्या क्रमांकावर आहे तर बाबर पाचव्या क्रमांकावर आहे.