लाहोर - आगामी इंग्लंड दौर्यावर सरफराज अहमदला संघाबाहेर बसणे हे कठीण आव्हान असेल, असे मत पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू राशिद लतीफ यांनी व्यक्त केले आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमदचा नुकताच इंग्लंड दौऱ्यासाठी 29 जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे. आपले क्रिकेटमध्ये पुनरागमन संस्मरणीय ठरावे, अशी इच्छा सरफराजने बोलून दाखवली होती. पाकिस्तानला 5 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान तीन सामन्यांची कसोटी मालिका आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे.
इंग्लंड दौरा मोठा असल्याने मोहम्मद रिझवानला पर्यायी यष्टीरक्षक म्हणून सरफराजला संघात स्थान देण्यात आल्याचे संघाचा मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हकने म्हटले होते. यावर लतीफ म्हणाले, "टी-20 मध्ये सरफराज पाकिस्तानची पहिली तर कसोटीत दुसरी पसंती असेल. कसोटीत रिझवानची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट आहे, म्हणून मला वाटत नाही, की सरफराजला कसोटीत रिझवानच्या जागी संधी मिळेल."
ते पुढे म्हणाले, "देशासाठी चॅम्पियन्स करंडक जिंकल्यानंतर आणि तीन-चार वर्षे पाकिस्तानचे नेतृत्व केल्यानंतर सरफराजला संघाबाहेर बसणे हे एक कठीण आव्हान असेल. परंतु हे अशक्य नाही आणि मला आशा आहे की या कठीण कामात विजय मिळवण्यासाठी तो लढा देईल."