नवी दिल्ली - पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारताच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ जसप्रीत बुमराहच्या भविष्याविषयी वक्तव्य केले आहे. गोलंदाजीच्या शैलीमुळे बुमराहला क्रिकेटच्या सर्व स्वरूपात खेळणे कठीण होईल, असे अख्तरने सांगितले. माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रासमवेत 'आकाशवाणी'मध्ये अख्तरने आपली प्रतिक्रिया दिली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
अख्तर म्हणाला, "कसोटीत त्याने आपली कौशल्ये दाखवली हे त्याचे धैर्य आहे. तो एक खूप कष्टकरी मुलगा आहे आणि तो खेळावर खूप लक्ष केंद्रित करतो. त्याला कुठे जायचे आहे हे माहित आहे. पण त्याची पाठ त्याला साथ देईल का हा मोठा प्रश्न आहे. बुमराहची गोलंदाजीची शैली ही वेगळी असल्यामुळे गोलंदाजीदरम्यान त्याच्या पाठीवर ताण येतो. त्याची पाठ हा ताण कितीकाळ सहन करु शकेल हा महत्वाचा प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वी तो दुखापतग्रस्त झाला होता. मी त्याचे सामने पाहत असताना माझ्या मित्रांना नेहमी सांगतो की हा जास्त काळ टिकणार नाही.''
बुमराहने आणि त्याच्या कर्णधाराने खूप सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण अशी गुणवत्ता फार कमी मिळते, असेही अख्तरने सांगितले. बुमराह न्यूझीलंडविरुद्ध यंदाच्या दौऱ्यात खेळला, मात्र या मालिकेत त्याला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. आता आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी बुमराह सज्ज झाला आहे.