नवी दिल्ली - भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना या मोसमात शानदार फलंदाजी केली आहे. पंतने आयपीएलच्या या मोसमात १६ सामने खेळताना ४८८ धावा केल्या आहेत, असे असतानाही पंतला भारताच्या विश्वकरंडकासाठीच्या संघात स्थान देण्यात आले नाही. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी भारतीय संघाला विश्वकरंडक स्पर्धेत पंतची कमतरता जाणवले असे मत व्यक्त केले आहे.
मोहम्मद अझरुद्दीन यांच्या मते, 'पंत हा एक आक्रमक आणि संघाला गरज असेल तेव्हा मोठे फटके मारणारा फलंदाज आहे. वेगाने धावा काढण्याची त्याची शैली ही भारतासाठी खूप मदतीची ठरली असती. त्यामुळे यंदाच्या विश्वकरंडकात भारताच्या संघाला ऋषभ पंतच्या वादळी खेळीची उणीव भासेल.'
३० मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये विश्वकरंडक स्पर्धेला सुरुवात होत आहे. तर भारताचा पहिला सामना हा ५ जूनला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघ
- विराट कोहली (कर्णधार) शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.