नवी दिल्ली - माजी भारतीय वेगवान गोलंदाज आणि प्रशिक्षक मदनलाल यांनी सचिन तेंडुलकरच्या कर्णधारपदाबद्दल भाष्य केले आहे. 1996 ते 2000 दरम्यान सचिनने 73 एकदिवसीय आणि 25 कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वात भारताने 23 एकदिवसीय सामने जिंकले होते. कसोटीत कर्णधार म्हणून सचिनला फक्त चार सामने जिंकता आले.
मदनलाल म्हणाले, "तो चांगला कर्णधार नव्हता हे मला पटत नाही, परंतु त्याने आपल्या कामगिरीवर इतके लक्ष केंद्रित केले की तो संघाची काळजी घेऊ शकला नाही."
ते पुढे म्हणाले, "कारण एक कर्णधार म्हणून आपल्याला फक्त आपल्या कामगिरीबद्दल विचार करण्याची गरज नाही. परंतु उर्वरित संघाकडूनही चांगली कामगिरी करवून घ्यायला हवी. आपण ते कसे हाताळता यावर बरेच काही अवलंबून असते. "
"सचिनकडे क्रिकेट समजून घेण्याची चांगली क्षमता आहे. कुठे चूक होत आहे आणि गोलंदाजी कशी करावी, हे तो खेळाडूंना सांगतो. या सर्व गोष्टींमध्ये तो हुशार होता", असेही मदनलाल म्हणाले आहेत.