चेन्नई - भारताचे माजी क्रिकेटपटू व्ही. बी. चंद्रशेखर यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने नाही तर, आत्महत्या केल्याने झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. चेन्नईतील आपल्या राहत्या घरी चंद्रशेखर यांनी गुरुवारी गळफास घेत आत्महत्या केली.
चंद्रशेखर यांनी तमिळनाडू प्रीमियर लीगमधील व्हीबी कांची वीरन्स या संघाची मालकी घेतली होती. पण, त्यानंतर, त्यांच्यावर कर्ज झाले होते. या कर्जाच्या बोजामुळे चंद्रशेखर यांनी आपले जीवन संपवले, असे पोलिसांनी सांगितले आहे.
व्ही. बी. चंद्रशेखर १९८७-८८ मध्ये दोन वेळा रणजी ट्रॅाफी जिंकणाऱ्या तमिळनाडू क्रिकेट संघाचे सदस्य होते. त्यांनी उत्तर प्रदेश विरुध्द झालेल्या सामन्यात उपांत्य फेरीत १६० धावा आणि रेल्वे विरुध्द अंतिम सामन्यांत ८९ धावा केल्या होत्या. चंद्रशेखर यांनी १९८८ ते १९९० मध्ये सात एकदिवसीय सामने खेळले होते. एकदिवसीय सामन्यांत त्यांच्या नावावर एक अर्धशतक जमा आहे.
चंद्रशेखर यांनी ८१ प्रथम श्रेणीच्या सामन्यांत ४ हजार ९९९ धावा केल्या आहेत. यामध्ये नाबाद २३७ ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. ते आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे क्रिकेट मॅनेजर होते. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला चेन्नईच्या संघाशी जोडण्यात त्यांचा मोठा वाटा होता.