मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्फोटक सलीमीवार वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. क्रिकेटच्या कारकिर्दीत मैदानात आक्रमक असणारा सेहवाग निवृत्तीनंतरही अनेकदा आक्रमक झाल्याचे आपण पाहिले आहे. ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक अशा अनेक सोशल मीडिया अॅप्प्सवर भन्नाट पोस्ट करून तो चाहत्यांची मने जिंकतो. आता सेहवागने अशीच एक पोस्ट करून चाहत्यांना वेड लावले आहे.
हेही वाचा - आयपीएल लिलावात 'आश्चर्यचकित' करणारे खेळाडू
सेहवागने आजच्या शिवजयंतीच्या निमित्ताने एक भन्नाट पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे. त्याने सर्वांना शुभेच्छा देत आगामी चित्रपट केजीएफ-२मधील एक संवाद छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वापरला आहे. ''इतिहास आपल्याला सांगतो की, शक्तिशाली लोक शक्तिशाली ठिकाणाहून येतात. इतिहास चुकीचा आहे! शक्तिशाली लोक ठिकाणे शक्तिशाली बनवतात", असे सेहवागने म्हटले.
शिवाजी महाराजांची ३९१वी जयंती
आज स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१ वी जयंती आहे. राज्यात प्रतिवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा मात्र कोरोना महामारीच्या सावटाखाली काही निर्बंध आणि नियमांचे पालन करत शिवजयंती साजरी करावी लागणार आहे. राज्य शासनाकडून शिवजयंती साजरी करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध लागू केले आहेत. त्या निर्णयावर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे, तर काहींनी स्वागतही केले आहे.
शिवनेरी किल्ल्यावर कलम १४४ लागू
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शिवजयंती कार्यक्रमासाठी सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे. महाराष्ट्र सरकारने नियमावली काढून शिवभक्तांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात शिवजयंतीला कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही, असे सरकारने सांगितल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी होती. त्यातच आता सरकारने शिवनेरी किल्ल्यावर शिवप्रेमींनी जमू नये यासाठी कलम १४४ लागू केले आहे.
कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.