चेन्नई - मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका आपल्या नावावर केली. अॅडलेडमधील मानहानीकारक पराभवानंतर भारताने दमदार कमबॅक करत ही कामगिरी नोंदवली. पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतलेल्या विराटमुळे अंजिक्यने संघाचे नेतृत्व केले.
हेही वाचा - भारताच्या माजी बॅडमिंटनपटूला ब्रेन ट्यूमर
नेतृत्वाची जबाबदारी सोपवल्यानंतर भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने अजिंक्य रहाणेला फोन केला होता. नेट्समध्ये जास्त फलंदाजी करू नकोस आणि कर्णधारपद सांभाळताना जास्त दबाव घेऊ नकोस, असे द्रविडने अजिंक्यला या फोन कॉलवर सांगितले होते. समालोचक हर्षा भोगले यांच्याशी बोलताना अजिंक्यने या गोष्टीचा खुलासा केला.
द्रविडचा अजिंक्यला फोन -
अजिंक्य म्हणाला, "आम्ही दुबईहून ऑस्ट्रेलियाला जात असताना मालिका होण्यापूर्वी राहुलभाईने मला फोन केला. तो मला म्हणाला, कोणताही दबाव घेऊ नकोस. मला माहित आहे की पहिल्या कसोटीनंतर तू कर्णधार असणार आहे. कशाचीही चिंता करू नकोस. फक्त मानसिकदृष्ट्या बळकट राहा. नेट्समध्ये जास्त फलंदाजी करू नकोस, अशा राहुलभाईकडून मिळालेल्या सल्ल्याची मी अपेक्षा ठेवली नव्हती."
अजिंक्य म्हणाला, "तुमची तयारी योग्य आहे, तुम्ही चांगली फलंदाजी करत आहात. कोणताही दबाव आणू नका. तुम्ही संघाचे नेतृत्व कसे कराल, तुम्ही खेळाडूंना कसा आत्मविश्वास द्याल याचा विचार करा. निकालाची चिंता करू नका, असे राहुलभाईने मला सांगितले. द्रविडशी झालेल्या या संभाषणामुळे माझे काम सोपे झाले. "
अजिंक्यने संघाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर भारताने दुसरी कसोटी आठ गड्यांनी जिंकली. यानंतर सिडनी येथे सामना अनिर्णित राहिला आणि ब्रिस्बेनमध्ये भारताने तीन गड्यांनी ऐतिहासिक विजय मिळवून मालिका २-१ अशी खिशात टाकली.