नवी दिल्ली - २००७ च्या विश्वकरंडक विजयामध्ये महत्वाची भूमिका बजावलेला भारतीय गोलंदाज जोगिंदर शर्मा सध्या कोरोनाविरूद्धच्या लढाईत देशाची सेवा करत आहे. लोकांनी घरातच राहावे आणि सरकारने घातलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनचे अनुसरण केले पाहिजे, असे हिसार जिल्ह्यात पोलिस उपअधीक्षक पदावर असलेल्या जोगिंदरने सांगितले. शिवाय, त्याने या पदावर असताना २४ तास कसे सतर्क असावे लागते, याची माहिती दिली.
जोगिंदर एका वृत्तसंस्थेला सांगितले, की माझा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो. मी घरी आठला परतलो तरी, मला मला आपत्कालीन सेवांसाठी तयार राहावे लागते. तसे पाहायचे झाले तर मी २४ तास कामावर असतो. मी नाही म्हणू शकत नाही.
तो पुढे म्हणाला, “मला जे भाग पाहायचे आहेत ती हिसारची गावे आहेत. आत्ता चेक पोस्टकडे पाहणे आणि केवळ ट्रक आणि बसलाच नव्हे तर सर्वसामान्यांनाही दिशा देणे या गोष्टीही त्यात येतात. जर कोणी विनाकारण बाहेर असेल तर आम्ही कायद्यानुसार त्यांना शिक्षा देऊ शकतो.”
२००७ च्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील अखेरच्या षटकात जोगिंदरने महत्वाची भूमिका बजावली होती. हा सामना पाकिस्तानविरूद्ध खेळला गेला होता. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. लोकांनी आपल्या घरात राहावे, म्हणून पोलिस कर्मचारी तातडीने आपले कर्तव्य बजावत आहेत. यावेळी जोगिंदरही पोलिस म्हणून आपले कर्तव्य बजावत असल्याचे समोर आले आहे.