लंडन - पहिल्यांदाच मला इंग्लंडमध्ये शिव्या ऐकाव्या लागल्या नाहीत, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने, पहिला टी-२० सामना संपल्यानंतर दिली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे. पहिला सामना काही तासांपूर्वीच पार पडला. अटातटीचा ठरलेल्या या सामन्यात इंग्लंडने २ धावांची बाजी मारली. हा सामना विनाप्रेक्षक खेळवण्यात आला. सामना संपल्यानंतर, पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये शिवी ऐकावी लागली नसल्याचं वॉर्नरने सांगितलं.
पत्रकारांशी बोलताना वॉर्नर म्हणाला, माझ्यासोबत असं पहिल्यांदा घडलं. मी इंग्लंडमध्ये होतो आणि मला शिवी ऐकावी लागली नाही. जेव्हा प्रेक्षकांनी मैदान भरलेलं असतं, त्यावेळी तुम्हाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. यामुळे मायदेशात आणि विदेशात खेळण्याची मजाच काही और आहे.
दरम्यान, पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा मलानच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने २० षटकांत ७ बाद १६२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाची सुरुवात दणकेबाज झाली. सलामीवीर जोडी डेव्हिड वॉर्नर आणि अॅरॉन फिंच यांनी पहिल्या गड्यासाठी ९८ धावांची भागीदारी केली.
फिंच-वॉर्नर जोडीच ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देणार असे वाटत असताना ऑर्चरने फिंचला बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावाला गळती लागली आणि ऑस्ट्रेलिया संघ २० षटकात ६ बाद १६० धावा करु शकला. वॉर्नरने ५८ धावांची खेळी केली. पण तो मोक्याच्या क्षणी बाद झाला. इंग्लडने या विजयासह मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
हेही वाचा - ENGvAUS : अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर दोन धावांनी विजय