चंदीगड - आंतरराष्ट्रीय टेनिस मॅच फिक्सिंग प्रकरणातील आरोपी रवींदर दांडीवाल याला सोमवारी पंजाब पोलिसांनी मोहाली येथून अटक केली. दांडीवालने नुकताच चंदीगडमध्ये श्रीलंका टी-20 लीगचा अनधिकृत सामना आयोजित केला होता.
अटक केल्यानंतर दांडीवालला न्यायालयात हजर केले. त्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. बीसीआयच्या रडारवर असलेल्या दांडीवालने नुकताच 29 जून रोजी युवा टी-20 लीग सामना आयोजित केला होता. हा सामना यू-ट्यूबवर दाखवला गेला.
बीसीसीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा (एसीयू) गट मोहालीला जाणार असून पोलिसांना ते दांडीवाल संबधित माहिती देणार आहेत. बीसीसीआयच्या एसीयूचे अध्यक्ष अजित सिंह यांनी सांगितले, "हो, दांडीवालला अटक करण्यात आली आहे. आम्ही त्याच्याकडून जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू. आम्ही आमच्याकडे असलेली माहितीही पोलिसांना सांगू."
चंदीगडच्या सवारा गावात पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमधील काही खेळाडू सामना खेळत होते. हा सामना श्रीलंकेच्या युथ टी-20 लीगचा सामना म्हणून प्रसारित झाला. मोहालीचे पोलिस अधिकारी कुलदीपसिंग चहल यांनी माध्यमांना सांगितले की, "दांडीवालला अटक करण्यात आली आहे. आम्ही या रॅकेटमधील त्याच्या भूमिकेचा तपास करत आहोत.''
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, "यात खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना 5000 ते 10,000 रुपये देऊन खेळायला बोलावले होते. काही रणजी खेळाडूंची भूमिका देखील तपासण्यासारखी आहे. ज्या खेळाडूंच्या त्वचेचा रंग काळा होता, ते श्रीलंकेचे खेळाडू खेळत आहेत, असे दिसून येईल म्हणून निवडले गेले होते.''
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या प्रकरणात आपला सहभाग आधीच नाकारला आहे.