गाले - इंग्लंड आणि श्रीलंका संघातील दुसरा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत आहे. या सामन्यात श्रीलंकेचा दुसरा डाव ३५.५ षटकात १२६ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडच्या फिरकीपटूंनी लंकेच्या फलंदाजांवर वर्चस्व राखत कमाल कामगिरी केली. विशेष म्हणजे, या डावात इंग्लंडच्या फिरकीपटूंना लंकेच्या सर्व फलंदाजांना माघारी धाडले. तर, पहिल्या डावात इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी संपूर्ण संघ बाद केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असे यापूर्वी कधीही घडले नव्हते.
गाले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने पहिल्या डावात अँजेलो मॅथ्यूजच्या (११०) शतकी खेळीच्या आणि दिनेश चंडिमल(५२), निरोशान डिकवेल्ला (९२) आणि दिलरुवान परेरा (६२) यांच्या अर्धशतकांमुळे ३८१ धावांचा डोंगर उभारला. या डावात इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. तर, मार्क वूडने ४ आणि सॅम करनने १ गडी बाद केला.
लंकेच्या दुसऱ्या डावात इंग्लंडकडून डॉम बेस आणि जॅक लीचने प्रत्येकी ४ आणि कर्णधार जो रूटने २ गडी बाद केले. विशेष म्हणजे हे तिघेही फिरकी गोलंदाज आहेत. श्रीलंकेने इंग्लंडसमोर १६४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिला कसोटी सामना इंग्लंडने सात गडी राखून जिंकला.
हेही वाचा - ''ऑस्ट्रेलियाचे खेळाडू लिफ्टमध्ये असताना...'', फिरकीपटू अश्विनचा गौप्यस्फोट