नवी दिल्ली - इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज रविवारी होणारा पहिला एकदिवसीय सामना पुन्हा एकदा रद्द करण्यात आला आहे. इंग्लंड संघाचे दोन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असण्याची शक्यता असल्याने हा सामना रद्द करण्यात आला आहे.
हेही वाचा - बॅडमिंटनपटू पारूपल्ली कश्यपला कोरोनाची लागण
संघ थांबलेल्या हॉटेलमधील दोन कर्मचाऱ्यांना कोरोना झाला होता. त्यानंतर शनिवारी इंग्लंडच्या खेळाडूंची आणि व्यवस्थापन विभागाची पीसीआर चाचणी घेण्यात आली. क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. "इंग्लंड संघातील दोन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असण्याची शक्यता आहे. मात्र, हे निश्चित झालेले नाही. वैद्यकीय पथकाच्या पुढच्या सल्ल्यापर्यंत हे सदस्य त्यांच्या खोलीत राहतील", असे निवेदनात सांगण्यात आले आहे.
ईसीबीचे जनरल डायरेक्टर अॅश्ले जाइल्स म्हणाले, "पहिला एकदिवसीय सामना खेळला जाऊ शकत नसल्याने आम्हाला दु:ख वाटत आहे. परंतु खेळाडू व सहायक कर्मचार्यांचे आरोग्य आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. आम्ही चाचणीच्या निकालाची प्रतीक्षा करू.''
हा सामना रद्द झाल्यानंतर सोमवारी आणि बुधवारी होणाऱ्या सामन्यांवरही टांगती तलवार आहे.