मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे २९ मार्चपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. सद्यस्थिती पाहता आयपीएलची शक्यता जवळपास नाहीच. पण, आयपीएल खेळवण्यासाठी अनेक पर्यायांचा विचार सुरू आहे. त्यात आयपीएल प्रेक्षकांविना हा एक पर्यायही आहे. या पर्यायाला भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आणि दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू अजिंक्य रहाणेने पाठिंबा दर्शविला आहे.
केंद्र सरकारने कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएल स्पर्धा दुसऱ्यांदा पुढे ढकलावी लागली. जर आयपीएल रद्द करण्यात आल्यास खेळाडूंसह बीसीसीआय, फ्रँचायझी, ब्राँडकास्टर्स यांना मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयपीएल खेळवण्यासाठी अनेक पर्यायांचा विचार सुरू आहे. यात असलेल्या प्रेक्षकांविना आयपीएल या पर्यायाला अजिंक्य रहाणेने पाठिंबा दर्शवला आहे.
दिल्ली कॅपिटल्सने इंस्टाग्राम लाईव्हचे आयोजन केले होते. यात अजिंक्य म्हणाला, 'सद्य परिस्थिती पाहता आयपीएल असो की अन्य खेळ असो प्रेक्षकांविना खेळवायला हरकत नाही. स्थानिक क्रिकेटमध्ये आपल्याला प्रेक्षकांविना खेळण्याची सवय आहेच ना.'
क्रिकेटमध्ये चाहत्यांशिवाय काही अस्तित्व नाही, हे आम्हाला माहित आहे. पण त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यांना घरी बसून लाईव्ह क्रिकेट पाहायला मिळाले तरी त्यांना आनंद होईल. प्रेक्षकांची सुरक्षितता सद्य घडीला महत्त्वाची आहे आणि त्यासाठी रिकाम्या स्टेडियममध्ये खेळावे लागले, तरी आम्ही तयार आहोत, असेही रहाणे म्हणाला.
हेही वाचा - HBD Rohit : रोहितने गुडघ्यावर बसून रिंग देत रितिकाला केलं प्रपोज, वाचा हिटमॅनची बॉलिवूड स्टाईल लवस्टोरी