लाहोर - पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) गुरुवारी ही माहिती दिली. "माझा मानसिक छळ होतोय. मी आत्तासाठी क्रिकेट सोडत आहे", असे आमिरने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा - विराट कोहलीकडून तब्बल ५१ वर्षे जुना विक्रम सर!
आमिरच्या या व्हिडिओनंतर पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी आमिरला संपर्क साधला. त्यावेळी २८ वर्षीय आमिरने निवृत्ती घेतल्याचे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा त्याचा कोणताही हेतू नसल्याचे कळवले आहे. आमिरने कसोटी क्रिकेट मधून २०१९ साली निवृत्ती जाहीर केली होती. नुकत्याच संपलेल्या लंका प्रीमियर लीगमध्ये आमिरने भाग घेतला होता.
मोहम्मद आमिरची कारकीर्द -
मोहमद आमिरने पाकिस्तान संघासाठी ३६ कसोटी, ६१ एकदिवसीय आणि ५० टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण २५९ बळी आपल्या नावावर केले आहेत. आपल्या स्विंग गोलंदाजीमुळे आमिर खूप प्रसिद्ध राहिला आहे. पाकिस्तान संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात आमिरने महत्वाची भूमिका बजावली. इंग्लंडमध्ये फिक्सिंग केल्याप्रकरणी त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. २०१५मध्ये बंदी पूर्ण करून तो क्रिकेटमध्ये परत आला होता.