लीड्स - विश्वकरंडक स्पर्धेमध्ये हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर शुक्रवारी श्रीलंकेसमोर बलाढ्य इंग्लंडचे आव्हान असणार आहे. हा सामना दुपारी ३ वाजता सुरू होईल. ईऑन मॉर्गन नेतृत्वात खेळणारा इंग्लंड सध्या तुफान फॉर्मात असून आतापर्यंत या स्पर्धेत त्यांनी ५ सामन्यांमध्ये ४ सामन्यात विजय मिळवत ८ गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे. तर श्रीलंकेचा संघ ४ गुणांसह सहाव्या स्थानी आहे. श्रीलंकेने आतापर्यंत ५ सामने खेळले असून त्यातील एका सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आले आहे. तर २ सामन्यात पराभव झाला असून २ सामने अनिर्णित राहिले आहे.
या विश्वकरंडक स्पर्धेत यजमान इंग्लंडला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. ईऑन मॉर्गन, जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, जो रूट आणि बेन स्टोक्स अशा तुफानी फलंदाजांचा भरणा इंग्लंडकडे आहे. त्यामुळे या सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
बलाढ्य इंग्लंडविरुद्धचा हा सामना श्रीलंकेला जिंकायचा असल्यास कर्णधार दिमुथ करुणारत्नेसह, कुशल परेरा, अँजेलो मॅथ्यूज आणि थिसारा परेरा यांना दमदार फलंदाजी करावी लागणार आहे. तर इंग्लंडच्या फलंदाजांना कमी धावसंख्येत रोखण्याचे आव्हान दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा आणि नुवान प्रदीप यांच्यापुढे असेल.
दोन्ही संघ
- श्रीलंका - दिमुथ करुणारत्ने (कर्णधार) लसिथ मलिंगा, अविष्का फर्नाडो, लाहिरु थिरिमाने, कुसल परेरा, कुसल मेंडिस, अॅँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी’ सिल्व्हा, जेफ्री वॅँडरसे, थिसारा परेरा, इसुरू उडाना, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप, जीवन मेंडिस, मिलिंदा सिरिवर्दना.
- इंग्लंड - ईऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जोस बटलर, जो रूट, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, आदिल रशीद, मार्क वूड, लिआम प्लंकेट, जोफ्रा आर्चर, जेम्स विन्स, लिआम डॉवसन, ख्रिस वोक्स, टॉम करन.