पुणे - भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेला उद्या (मंगळवार ता. २३) पासून सुरूवात होत आहे. उभय संघातील ही मालिका पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला सुरूवात होण्याआधी, आम्ही तुम्हाला भारत-इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामन्याची हेड-टू-हेड आकडेवारी देत आहोत. वाचा कोणता संघ वरचढ ठरला आहे...
एकदिवसीय सामन्यात कोणाचा पगडा भारी -
भारत-इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण १०० एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. यात भारतीय संघाने ५३ सामन्यात विजय मिळवला आहे. तर इंग्लंडने ४२ सामन्यात बाजी मारली आहे. तर २ सामने बरोबरीत सुटले आहेत. याशिवाय राहिलेल्या ३ सामन्याचा निकाल लागलेला नाही. ही आकडेवारी पाहिल्यास भारतीय संघाचा पगडा भारी असल्याचे दिसून येते.
इंग्लंडची भारतातील कामगिरी
इंग्लंडने भारतात, भारताविरुद्ध ४८ एकदिवसीय सामने खेळली आहेत. यातील ३१ सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. तर १६ सामन्यात त्यांना विजय साकारता आला आहे. तर एक मॅच टाय झाली होती. ही आकडेवारी पहिल्यास भारतीय संघ मायदेशात असल्याचे दिसून येते.
गहुंजे स्टेडियममध्ये कोणाचा बोलबाला -
उभय संघात पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये फक्त एक एकदिवसीय सामना झाला आहे. १५ जानेवारी २०१७ रोजी झालेल्या या सामन्यात भारताने ७ गडी राखून विजय मिळवला होता. विशेष म्हणजे इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या ३५१ धावांचे आव्हान भारताने ११ चेंडू राखत ३ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले होते.
कोहलीची टी-२० मालिकेत विराट कामगिरी -
इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत विराटची कामगिरी उल्लेखनीय ठरली. पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरल्यानंतर विराटने सलग तीन सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने पाच सामन्यात १४७.१३ च्या स्ट्राइक रेटने २३१ धावा केल्या. या कामगिरीमुळेच विराटला मालिकावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
हेही वाचा - जोफ्रा आर्चर IPL मधून बाहेर पडल्यास.., 'या' ३ गोलंदाजांवर असेल राजस्थानची नजर
हेही वाचा - IND Vs ENG : विराटला 'हे' रेकॉर्ड मोडण्याची नामी संधी