दुबई - इंग्लंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडीजचा 2-1 असा पराभव केला. या विजयामुळे इंग्लंडचा संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये तिसर्या क्रमांकावर पोहोचला आहे. ओल्ड ट्रॅफर्ड रंगलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक कसोटीत इंग्लंडने वेस्ट इंडिजला 269 धावांनी पराभूत केले.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंड आता 226 गुणासंह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर भारत (360 गुण) असून दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा संघ (296 गुण) आहे. तर मालिका गमावलेला विंडीजचा संघ सातव्या स्थानी आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंड 146 गुणांसह चौथ्या स्थानावर होता.
यापूर्वी इंग्लंडने ऑस्ट्रेलियासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत रोखली होती. तर दक्षिण आफ्रिकेसह चार सामन्यांच्या कसोटी सामन्यांची मालिका 3-1 ने जिंकली होती.
चॅम्पियनशिप अंतर्गत वेस्ट इंडीजने भारताविरूद्धची घरच्या मैदानावर झालेली शेवटची मालिका 0-2 ने गमावली. इंग्लंडला आता त्यांची पुढील मालिका 5 ऑगस्टपासून पाकिस्तानविरूद्ध खेळायची आहे.