लंडन - पुढील आठवड्यापासून इंग्लंडचे क्रिकेटपटू आपले वैयक्तिक प्रशिक्षण सुरू करतील. कोरोनामुळे क्रिकेटसंबधित कामे आणि स्पर्धा ठप्प झाल्या आहे. मात्र, लवकरच परिस्थिती बदलेल अशी अपेक्षा आहे. माजी क्रिकेटपटू आणि इंग्लंड क्रिकेचचे संचालक अॅश्ले जाईल्स म्हणाले, “क्रिकेटच्या पुनरागमनाच्या दृष्टीने ही अगदी प्राथमिक पावले आहेत”.
एका वृत्तानुसार, गोलंदाज वेगवेगळ्या काऊंटी मैदानावर सराव करतील आणि गरज पडल्यास त्यांच्यासोबत प्रशिक्षक, फिजीओही असतील. उर्वरित खेळाडू दोन आठवड्यांनंतर सरावात परत येतील. क्रिकेटला परत आणण्यासाठी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) सरकारशी जवळून काम करत आहे.
मार्चच्या मध्यापासून इंग्लंडमध्ये सर्व प्रकारचे क्रिकेट उपक्रम बंद आहेत. 1 जुलैपर्यंत सर्व प्रकारचे व्यावसायिक क्रिकेट निलंबित केले जाईल, असे ईसीबीने म्हटले आहे.