लंडन - इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंसाठी एक निर्णय घेतला आहे. हा निर्णय काही खेळाडूंना रुचणार नाही. कारण ईसीबीने खेळाडूंना सामना चालू असताना स्मार्टवॉच घालण्यावर बंदी घातली आहे.
आपल्याला अनेकदा खेळाडू महागडे गॅजेट्स मैदानात घातलेले पाहायला मिळाले आहे. पण आता इंग्लंडचे खेळाडू सामन्यादरम्यान स्मार्टवॉच घालू शकणार नाहीत. दरम्यान, ईसीबीने भ्रष्टाचारविरोधी नियम कठोर करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
ईसीबीने याविषयी सांगितले की, 'काऊंटी क्रिकेटच्या अनेक सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग केले जाते. त्यामुळे या नियमांना कठोर करण्यात येत आहे. खेळाडू, सामनाधिकारी स्मार्टवॉच घालू शकणार नाहीत. फक्त जे सामने टीव्हीवर लाईव्ह पाहता येणार नाहीत, त्याच सामन्यांमध्ये स्मार्टवॉच वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.'
आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान, कोणत्याही खेळाडूला स्मार्टवॉच घालण्याची परवानगी नाही. आयसीसीने भ्रष्टाचारविरोधी नियमानुसार याबाबत खास निर्देश दिले आहेत. स्मार्टवॉच फोनला कनेक्ट करता येते. यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे.
२०१९ च्या कौंटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत, स्टीव्हन क्रॉफ्टने लँकशायरचा फिरकीपटू मॅट पार्किन्सनला इंग्लंडकडून पदार्पणाची संधी मिळणार असल्याचे स्मार्टवॉचच्या साहाय्याने सूचित केले होते. त्यावेळी माहितीच्या देवाणघेवाणीचा हा स्रोत उजेडात आला होता.
हेही वाचा - अशी घ्या आयपीएल..! राजस्थान रॉयल्सने काढला तोडगा
हेही वाचा - हरभजन पाकिस्तानला म्हणतोय 'पंगा मत लेना', शेअर 'तो' व्हिडिओ