लंडन - इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात आज साऊथम्प्टनमध्ये होणाऱ्या पहिला कसोटीपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे तब्बल 117 दिवसानंतर पुनरागमन होणार आहे. कोरोनामुळे यंदाच्या मार्चच्या मध्यापासून क्रिकेट बंद होते.
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने काही बदल केले आहेत, त्यानुसार ही मालिका रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय खेळली जाईल. याव्यतिरिक्त, आयसीसीने चेंडूला चमकवण्यासाठी लाळेच्या वापरावर बंदी घातली आहे. ही दोन्ही संघांसाठी चिंतेची बाब आहे. कारण इंग्लंडच्या परिस्थितीवर वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व आहे आणि दोन्ही संघांमध्येही चांगले वेगवान गोलंदाज आहेत.
जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्या व्यतिरिक्त ख्रिस वोक्स आणि जोफ्रा आर्चर हे वेगवान गोलंदाज इंग्लंडमध्ये आहेत. त्याचबरोबर विंडीजकडे शेनन गॅब्रिएल, केमार रोच, कर्णधार जेसन होल्डर आणि अल्झारी जोसेफ आहेत. लाळ बंदीचा त्यांच्या कामगिरीवर कसा परिणाम होतो आणि फलंदाज त्यांच्यावर वर्चस्व गाजवतात का? याकडे सर्वांचे लक्ष असेल.
वेस्ट इंडिजची फलंदाजी हा त्यांचा कमकुवत दुवा आहे. क्रेग ब्रेथवेट आणि शाय होपवर यांच्यावर विंडीज अवलंबून असेल. हे दोघे संघाच्या फलंदाजीची धुरा आहेत. इंग्लंडने या दोघांची विकेट घेतल्यास विंडीजला सावरणे कठीण होऊ शकते. इंग्लंडलाही येथे अडचणींचा सामना करावा लागू शकतो, कारण नियमित कर्णधार जो रुटच्या अनुपस्थितीमुळे संघाला थोडी चिंता आहे. रूटच्या अनुपस्थितीत बेन स्टोक्स संघाचे नेतृत्व करत आहे. रोरी बर्न्स, जोए डेन्ले, जॅक क्रॉले यांच्याकडे फलंदाजीची मदार आहे. इंग्लंडकडे जोस बटलर आणि स्टोक्स असे दोन अनुभवी खेळाडू आहेत, जे आपल्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे सामन्याला कलाटणी देऊ शकतात.
संघ -
इंग्लंड : बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, रोरी बर्न्स, डोम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर (यष्टीरक्षक), जैक क्रॉले, जोए डेन्ले, ओली पोप, डोम सिब्ले, मार्क वुड, ख्रिस वोक्स.
वेस्ट इंडीज : जेसन होल्डर (कर्णधार), जर्मेने ब्लॅकवुड, निकुरमाह ब्रोनर, क्रेग ब्राथवेट, शारमहा ब्रूक्स, जॉन कॅम्पबेल, रोस्टन चेस, रखीम कोर्नवेल, शेन डॉवरिच, शेनन गॅब्रिएल, चेमार होल्डर, शाय होप, अल्झारी जोसेफ, रेमन रेइफर, केमार रोच.