मेलबर्न - ऑस्ट्रेलिया देश महिला सीईओसाठी तयार आहे, असे मत ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटस्टार एलिसा पेरीने दिले आहे. केव्हिन रॉबर्ट्सच्या जागी क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये हंगामी मुख्य कार्यकारी म्हणून पदभार स्वीकारलेल्या निक हॉकले यांनी नवीन योजना आणली आहे. यामुळे खेळात 'दीर्घकालीन स्थिरता आणि विकास' सुनिश्चित होईल असा त्यांचा विश्वास आहे. कोरोनाच्या काळात घेतलेल्या निर्णयाबद्दल रॉबर्ट्सन यांना टीकेचा सामना करावा लागला होता.
पेरीने शुक्रवारी एका व्हिडिओ कॉलवर पत्रकारांना सांगितले, ''मला वाटते क्रिकेट ऑस्ट्रेलिया महिला सीईओसाठी तयार आहे.'' पेरीच्या म्हणण्यानुसार, पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख क्रिस्टीना मॅथ्यू या पदासाठी सर्वात योग्य उमेदवार असू शकतात.
ती म्हणाली, "सीएमध्ये बर्याच महिला उच्च पदावर कार्यरत आहेत. बेलिंडा क्लार्क आणि स्टेफ बेल्ट्राम ही यातील नावे आहेत. आपण ज्या पद्धतीने काम करतो त्या दृष्टीने त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे."
त्याच वेळी, ऑस्ट्रेलियात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार सीएने इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉसला सीईओपदासाठी अर्ज करण्यास सांगितले आहे.