नवी दिल्ली - वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्होने आपल्या आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे कौतुक केले आहे. ब्राव्हो म्हणाला की, ''धोनी खेळा़डूंना मुक्तपणे खेळू देतो. ज्यामुळे मैदानावर चांगला निकाल मिळतो.'' कोरोनाव्हायरसमुळे आयपीएलचा तेरावा हंगाम अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आला आहे.
एका संकेतस्थळावर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये ब्राव्हो म्हणाला, "चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये खूप काळापासून चांगले कर्णधार होते. आमच्याकडे फाफ डु प्लेसिस, ब्रेंडन मॅक्क्युलम, माइक हसी आणि मीसुद्धा होतो. हे सर्व वेगवेगळ्या देशांचे कर्णधार आहेत. धोनी नेहमीच म्हणतो, तुम्ही उत्तम आहात म्हणून इथे आहात. तुम्हाला काही सिद्ध करण्याची गरज नाही. तुम्ही काय योगदान देऊ शकता, हे फ्रेंचायझीला माहित आहे.''
ब्राव्हो पुढे म्हणाला, "धोनी कोणावर दबाव आणत नाही. सामन्यानंतर आपण त्याला फार क्वचितच पाहू शकतो. तुम्ही त्याच्या रुममध्ये कधीही जाऊ शकता. त्याने खूप सामने खेळले आहेत म्हणून त्याच्याशी बोलण्याचा अनुभव विलक्षण आहे. प्रत्येकाला चांगले वाटेल अशी परिस्थिती तो तयार करतो. इतका मोठा सन्मान मिळूनही तो सुपरस्टारसारखा वागत नाही.''