अबुधाबी - आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज ३९वा सामना रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांना प्ले ऑफ गाठण्याच्या उद्देशाने हा सामना महत्वाचा आहे. वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने हैदराबादविरुद्धच्या मागील सामन्यात भेदक मारा करत कोलकाताला सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकून दिला होता. तर दुसरीकडे बंगळुरूने राजस्थानवर ७ गडी राखून विजय मिळवला होता.
इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वात खेळणारा कोलकाताचा संघ गुणतालिकेत १० गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे विराटचा बंगळुरू संघ तिसऱ्या स्थानी आहे. बंगळुरूचे १२ गुण आहेत.
कोलकाताचा सलामीवीर राहुल त्रिपाठी एक सामना वगळता मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. तर दुसरा सलामीवीर शुबमन गिल सातत्याने धावा करत आहे. मागील सामन्यात दिनेश कार्तिक आणि इयॉन मार्गन या जोडीने फटकेबाजी केली. पण त्यांचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलला अद्याप सूर गवसलेला नाही. पॅट कमिन्स गोलंदाजीसोबत फलंदीतही योगदान देत आहे. शिवम मावी, नागरकोटी यांनी चांगला मारा केला आहे. लॉकी फर्ग्युसन संघात आल्यामुळे कोलकाताची गोलंदाजी आणखी बळकट झाली आहे. कुलदीप यादवला आपली कामगिरी उंचावण्याची गरज आहे.
दुसरीकडे बंगळुरूचा संघ फार्मात आहे. त्याची सलामीवीर जोडी देवदत्त पडीक्कल आणि अॅरोन फिंच संघाला आश्वासक सुरूवात करून देण्यात यशस्वी ठरत आहे. यानंतर विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स मधल्या फळीत सातत्याने धावा करत आहेत. गोलंदाजीत नवदीप सैनी, इसूरू उडाना, शिवम दुबे चांगला मारा करत आहेत. त्यांना युजवेंद्र चहल आणि वॉशिग्टन सुंदरच्या फिरकीची साथ मिळत आहे. ख्रिस मॉरिस संघासाठी अष्टपैलू कामगिरी नोंदवत आहे. दरम्यान, याच हंगामात बंगळुरूने कोलकाताचा मोठा पराभव केला होता. या पराभवाची परतफेड करण्यासाठी कोलकाताचा संघ उत्सुक आहे.
- कोलकाता नाइट राइडर्सचा संघ -
इयॉन मॉर्गन (कर्णधार), शुबमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्यूसन, पॅट कमिंन्स, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, टॉम बँटन, सिद्धेश लाड, कमलेश नागरकोटी, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वारियर, शिवम मावी, रिंकू सिंह, ख्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ आणि निखिल नाईक.
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ -
विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, पार्थिव पटेल, अॅरोन फिंच, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, मोईन अली, मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, डेल स्टेन, पवन नेगी, इसुरु उदाना, शिवम दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंह मान, वाशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे आणि अॅडम झम्पा.