कोलकाता - भारताचा अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी डावलण्यात आले होते. त्याच्या जागी युवा ऋषभ पंतला संधी देण्यात आली. मात्र, तो सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे दिनेशला संधी द्यावी अशी मागणी पुढे येत आहे. केकेआरचे प्रशिक्षक सायमन कॅटीचनेही दिनेश कार्तिकच्या समर्थनार्थ पुढे येत प्रतिक्रिया दिली आहे.
सायमन कॅटिच म्हणाले की, दिनेश पुन्हा एकदा फिनिशरची भूमिका चोख पार पाडेल. विश्वचषकासाठी भारतीय संघात आपला दावा मजबूत करेल असा विश्वात त्यांनी व्यक्ता केला आहे.
दिनेश आयपीएलमध्ये कोणत्या क्रमांकावर खेळेल या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, सामन्याची परिस्थिती पाहून त्याचा उपयोग करु. त्याला संघ दबावात असताना कशी कामगिरी करायची याचा अनुभव आहे. यापूर्वी त्याने दबावाच्या परिस्थितीत भारतीय संघ आणि केकेआरसाठी काही आकर्षक खेळी केल्या आहेत.
सायमन पुढे बोलताना म्हणाले की, दिनेश आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन विश्वचषक संघात आपला दावा मजबूत करु शकतो. यंदाचा आयपीएलचा मौसम हा कोलकाताच्या संघासाठी आव्हानात्मक असेल. कारण त्याचे महत्वाचे दोन गोलंदाज शिवम मावी आणि कमलेश नागरकोटी दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.