मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आपल्या रोखठोक विधानासाठी नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी भारताच्या कॅप्टन कुलबद्दल मोठे विधान केले आहे. 'धोनीची वेळ संपली असून संघ व्यवस्थापनाने त्याचा पर्यायी खेळाडू निवडावा', असे गावस्करांनी म्हटले आहे.
हेही वाचा - विश्व -६ रेड स्नूकर चॅम्पियनशिप : पाकच्या खेळाडूला पाणी पाजून पंकज अडवाणी उपांत्यपूर्व फेरीत दाखल
सुनील गावस्कर यांनी धोनीऐवजी युवा खेळाडू रिषभ पंतचे नाव सुचवले आहे. धोनीला सन्मानाने निरोप देऊन त्याचा पर्यायी खेळाडू शोधणे महत्वाचे आहे असे गावस्कर म्हणाले. भारताचा कर्णधार विराट कोहलीने नुकतेच धोनीबद्दल मत व्यक्त केले होते. ३८ वर्षीय धोनीला कोणताही पर्याय नाही असे विराट म्हणाला होता.
'संघासाठी धोनीने दिलेले योगदान अमुल्य आहे. त्याने धावांव्यतिरिक्त यष्ट्यांमागूनही चागंली कामगिरी केली आहे. तो संघात असल्याने कर्णधाराला फायदा होतोच पण, तो आता ३८ वर्षांचा आहे आणि टीम इंडियाने पुढचा विचार करायला हवा. कारण, टी-२० विश्वकरंडक स्पर्धा येईपर्यंत तो ३९ वर्षांचा होईल. त्यामुळे त्याने आता थांबायला हवे', असे गावस्करांनी म्हटले आहे.
यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत धोनी आपल्या संथ खेळीमुळे टीकेचा धनी ठरला होता. अनेक माजी खेळाडूंनी त्याला निवृत्तीचाही सल्ला दिला होता.
टी-२० विश्वकरंडकपूर्वी विराटचा खेळाडूंना इशारा -
ऑस्ट्रेलियात २०२० मध्ये होणाऱ्या आगामी टी-२० विश्वकरंडकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाची बांधणी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून दक्षिण आफ्रिका विरुध्दच्या टी-२० मालिकेत युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या संधीचे सोने करा, अथवा संघात स्थान मिळवणे कठिण जाईल, असा इशारा कर्णधार विराट कोहलीने दिला आहे.