नवी दिल्ली - इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला सार्वकालिन महान कर्णधार म्हटले आहे. भारतीय क्रिकेट संघ आणि आयपीएलमधील चेन्नई संघाचे कर्णधारपद भूषवताना त्याने खूप अपेक्षा उंचावल्या असल्याचेही पीटरसन म्हणाला.
पीटरसनने एका वाहिनीवरील कार्यक्रमात आपली प्रतिक्रिया दिली. “धोनीकडून ज्या अपेक्षा केल्या गेल्या होत्या त्या विरोधात जाणे कठीण आहे. त्याने भारताचे नेतृत्व केले आणि त्यानंतर चेन्नईचे नेतृत्व केले. तो सर्व परिस्थितीतून गेला आहे.”
धोनीच्या नेतृत्वात भारताने पहिली टी-२० विश्वकरंडक स्पर्धा जिंकली. त्याच्या नेतृत्वात २०११मध्ये तब्बल २८ वर्षानंतर भारत एकदिवसीय विश्वकरंडक विजेता ठरला. २०१३मध्ये धोनीने भारताला चॅम्पियन ट्रॉफीच्या जेतेपदाचा मानही मिळवून दिला.
ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज माईक हसीने महेंद्रसिंह धोनीचे कौतुक करत त्याला क्रिकेटचा सार्वकालिन महान 'फिनिशर' म्हटले आहे. एका कार्यक्रमादरम्यान संजय मांजरेकर यांच्याशी संवाद साधताना हसी म्हणाला, "धोनी हा एक सार्वकालिन महान फिनिशर आहे, ज्याला क्रिकेट जगाने जन्म दिला आहे."