मुंबई - भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटपासून २ महिने विश्रांती घेतल्यानंतर नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. धोनीने भारतीय सेनेच्या पॅराशूट रेजिमेंटसोबत प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. ३८ वर्षीय धोनी पॅराशूट रेजिमेंटच्या (१०६ पॅरा टीए बटालियन) प्रादेशिक सेनेमध्ये लेफ्टनंट कर्नलची पोस्ट सांभाळणार आहे.
धोनी बुधवारी बंगळुरु येथील पॅराशूट रेजिमेंटच्या बटालियनमध्ये सामील झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलैपासून धोनी प्रादेशिक सेनेसोबत काश्मीर खोऱ्यात काम करणार आहे. यादरम्यान, धोनी पॅट्रोलिंग आणि गस्तीचे काम करणार आहे. धोनी १५ दिवस हे काम करणार आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी सेनेसोबत काम करण्याच्या विनंतीला मंजुरी दिली आहे.
२०११ साली भारतीय सेनेने धोनीला लेफ्टनंट कर्नलचा सन्मान दिला होता. धोनीशिवाय, अभिनव बिंद्रा आणि दीपक राव यांनाही हा सन्मान देण्यात आला होता. २०१५ साली धोनीने याचे प्रशिक्षणही घेतले आणि पॅराट्रुपरची पात्रता मिळवली. आग्रा येथील प्रशिक्षण केंद्रावर सेनेच्या विमानातून धोनीने ५ वेळा विमानातून उडी घेतली होती.
भारतीय सेनेबद्दल धोनीची आदराची भावना आणि प्रेम जगजाहीर आहे. खूप दिवसांपासून धोनी पॅराशूट रेजिमेंटसोबत काम करण्यासाठी उत्सुक होता. परंतु, क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्याला अडचणी येत होत्या. धोनीने उचललेल्या या पावलामुळे भारतीय सेनेबद्दल युवा वर्गात जागरुकता पसरणार आहे. धोनीनाही युवा वर्गात भारतीय सेनेबद्दल जागरुकता करायची आहे.