नवी दिल्ली - भारतीय गोलंदाजीतील सातत्य हा गेल्या काही वर्षांमधील भारतासाठी अत्यंत चिंतेचा विषय होता. मात्र, २०१९ मध्ये भारतीय गोलंदाजीसाठी 'अच्छे दिन' आले असे म्हणायला हरकत नाही. कारण २०१९ मध्ये भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजीचा नजराणा पेश केला आहे. याच कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने अनेक सामने जिंकली आहेत. दरम्यान, याच वर्षी भारताच्या तीन गोलंदाजांनी क्रिकेटच्या तिनही प्रकारात हॅट्ट्रिक घेतली. महत्वाचे म्हणजे क्रिकेट इतिहासात अस प्रथमच घडलं की, एका देशाच्या तीन गोलंदाजांनी एका वर्षात ३ हॅट्ट्रिक घेतली आहे. वाचा कोण आहेत ते गोलंदाज...
मोहम्मद शमी -
आयसीसीच्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत मोहम्मद शमीने अफगाणिस्तान विरुध्दच्या सामन्यात हॅट्ट्रिक साधली. २२ जून २०१९ रोजी झालेल्या या सामन्यात शमीने अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबी (५२), अफताब आलम (०) आणि मुजीब उल रहमान (०) याला तीन चेंडूत बाद केले होते.
जसप्रीत बुमराह -
विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर गेला होता. विडींज दौऱ्यातील कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराहने भेदक गोलंदाजी केली. त्याने मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात हॅट्ट्रिक घेतली. पहिल्या डावात गोलंदाजी करताना बुमराहने ९ षटकात डॅरेन ब्राव्हो (४), शाहमार ब्रुक्स (०) आणि रोस्टन चेज (०) यांना बाद केले होते.
दीपक चहर -
बांगलादेश विरुध्द नुकत्याच पार पडलेल्या टी-२० मालिकेत युवा गोलंदाज दीपक चहरने हॅट्ट्रिक साधली. चहरने तिसऱ्या व निर्णायक सामन्यात शफीकुल इस्लाम, मुश्फीकुर रहिम आणि अमीनुल इस्लाम यांना माघारी धाडले. महत्वाचे म्हणजे, चहर टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून पहिली हॅट्ट्रिक साधणारा पहिला गोलंदाज ठरला.