दिल्ली - आयपीएलमध्ये आज फिरोजशाह कोटला मैदानावर खेळल्या गेलेल्या राजस्थानविरुद्ध सामन्यात दिल्लीने ५ गडी राखून विजय मिळवला आहे. या पराभवासह राजस्थान रॉयल्सचे आयपीएलमधील आव्हानही संपुष्टात आले. या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना ९ विकेट गमावत ११५ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने १६.१ षटकांमध्ये ५ विकेट गमावत विजय साजरा केला.
दिल्लीसाठी ऋषभ पंतने ३८ चेंडूत ५३ धावांची अर्धशतकी खेळी करत संघाला शानदार विजय मिळूवन दिला. या विजयासह दिल्लीने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
राजस्थानकडून रियान पराग वगळता एकाही फलंदाला मोठी खेळी करता आली नाही. रियानने ५० धावांची अर्धशतकी खेळी करत राजस्थानची धावसंख्या १०० पार नेली. दिल्लीसाठी इशांत शर्मा आणि अमित मिश्रा यांनी प्रत्येकी ३ विकेट घेत राजस्थानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.तर ट्रेंट बोल्टने २ विकेट घेत त्यांना चांगली साथ दिली.