दुबई - 'करो या मरो' सामन्यात मुंबई इंडियन्सला दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मात दिल्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबचा सामना आज गुणतालिकेत अव्वलस्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. आजच्या सामन्यात पंजाबला विजयाची नितांत गरज आहे. तर दुसरीकडे दिल्लीचा संघ दोन गुणांची कमाई करत प्ले ऑफमध्ये स्थान मिळविण्यासाठी इच्छुक आहे. आजच्या सामन्यासाठी दिल्ली आपल्या संघात बदल करू शकते. कारण त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत दुखापतीतून सावरला आहे. तो संघात परतण्यासाठी तयार झाला आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्याच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले होते. तो क्षेत्ररक्षण दरम्यान, लंगडताना पाहायला मिळाला. यामुळे तो काही दिवसासाठी संघाबाहेर होता. पंतच्या जागेवर दिल्लीने अजिंक्य रहाणेला संघात संधी दिली होती. पण अजिंक्य आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला. दरम्यान, आता पंत दुखापतीतून सावरला आहे. तो संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.
आजच्या पंजाबविरुद्धच्या सामन्यात पंतला संघात स्थान मिळू शकते. दुसरीकडे पंजाबचा विजयी संघ कायम राहण्याची आशा आहे. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ सलामीला येतील. यानंतर श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिमरोन हेटमायर हे मधली फळीत सांभाळतील. दरम्यान, दुखापतीमुळे दिल्लीचे अनुभवी खेळाडू अमित मिश्रा, इशांत शर्मा आयपीएलमधून बाहेर पडले आहेत.
हेही वाचा - DC vs KXIP : दिल्लीसमोर मनोबल उंचावलेल्या पंजाबचे आव्हान
हेही वाचा - 'थाला फक्त एकच आणि तो कोण हे सर्वांना माहित आहे', चाहत्याच्या कमेंटवर राहुलचे भन्नाट प्रत्युत्तर