दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामात सर्व संघांचे जवळपास ७ सामने खेळून झालेले आहेत. यात गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघानी दमदार कामगिरी नोंदवली आहे. याशिवाय रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्सची कामगिरी सुधारताना दिसत आहे. पण हैदाराबाद, राजस्थान, चेन्नई आणि पंजाबच्या संघांना अद्याप सूर गवसलेला नाही. अशा परिस्थितीत स्पर्धेतील एका संघाने बदली खेळाडू देण्याची विनंती बीसीसीआयकडे केलेली आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाने बदली खेळाडू मिळावा, यासाठी बीसीसीआयकडे विनंती केली आहे. त्यांनी दुखापतग्रस्त इशांत शर्माच्या जागेवर एक खेळाडू द्यावा, असे बीसीसीआयला कळवले आहे.
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स खेळाडूंच्या दुखापतीमुळे चिंतीत आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याच्या पाठीच्या दुखापतीने ७ ऑक्टोबरच्या सराव सत्रात उचल खाल्ली. दुखापतीवर उपचार करताना दुखापत गंभीर असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. यानंतर दिल्लीचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रालाही दुखापत झाली. तो देखील स्पर्धेतून बाहेर पडला. या दोन धक्क्यानंतर दिल्लीला पंतच्या रुपाने आणखी एक धक्का बसला. ऋषभ पंत देखील दुखापतीमुळे काही सामने खेळू शकणार नाही.
दिल्लीसाठी आयपीएलचा तेरावा हंगाम आतापर्यंत चांगला राहिला आहे. दिल्लीने सात सामन्यांपैकी पाच सामन्यात विजय मिळवले आहेत. गुणतालिकेत ते दुसऱ्या स्थानावर आहेत.
हेही वाचा - आयपीएल २०२० : विराटसेनेकडून केकेआरची 'धोबीपछाड': ८२ धावांनी चारली पराभवाची धूळ
हेही वाचा - IPL २०२० Points Table : आरसीबीची भरारी, तर कोलकाताची घसरण, जाणून घ्या गुणतालिकेतील बदल...