कोलकाता - भारतीय कर्णधार विराट कोहली प्रकाशझोतातील (डे-नाईट) कसोटीसाठी तयार आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवनियुक्त अध्यक्ष सौरव गांगुलीने दिली.
मागील काही दिवसांपासून कर्णधार विराट कोहली प्रकाशझोतामधील कसोटीच्या विरोधात असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता गांगुलीने सांगितले की, कसोटी क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यासाठी बदल गरजेचा आहे. याचाच एक प्रयोग म्हणून प्रकाशझोतातील कसोटीकडे पाहिले जात आहे. प्रकाशझोतातील कसोटीसाठी विराट आणि आमचे एकमत झाले आहे. दरम्यान, बीसीसीआयची सुत्रे हाती घेतल्यानंतर सौरव गांगुली आणि विराट कोहलीची बीसीसीआयच्या मुख्यालयात पहिल्यांदाच भेट झाली. या बैठकीतनंतर गांगुलीने याबाबत माहिती दिली.
सौरव गांगुलीने बीसीसीआयचा पदभार स्वीकारला असून तो पुढील वर्षी २०२० पर्यंत या पदावर राहणार आहे. गांगुलीचे नाव अध्यपदासाठी निश्चित झाल्यानंतर ईडन गार्डन्स स्टेडियमवर बंगाल क्रिकेट संघटनेकडून गांगुलीचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी गांगुलीने मी प्रकाशझोतातील कसोटी सामन्याचा समर्थक असून पदभार स्वीकारल्यापासून या कसोटी सामन्यांसाठी मी पाठपूरवठा करेन, असे सांगितले होते.
दरम्यान, आता गांगुली आणि विराट यांच्यात एकमत झाल्याने, भारतीय संघ प्रकाशझोतातील कसोटी खेळताना पाहायला मिळेल, अशी आशा आहे.
हेही वाचा - संघात पुनरागमन केल्यानंतर पाहा काय म्हणाला क्रिकेटपटू खलील अहमद?
हेही वाचा - कर्नाटकने मिळवला विजय हजारे ट्रॉफीचा मान, पटकावले चौथे विजेतेपद