हैदराबाद - चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आयपीएलमध्ये शंभर झेल घेणारा दुसरा यष्टीरक्षक बनला आहे. रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात धोनीने ही कामगिरी केली. या सामन्यात चेन्नईने १० गडी राखून विजय मिळवला.
पंजाबच्या डावाच्या १८व्या षटकात धोनीने शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर लोकेश राहुलचा झेल घेतला आणि आयपीएलमध्ये १०० झेल पूर्ण केले. आयपीएलमध्ये धोनीचे १९५ सामन्यांत १३९ बळी आहेत. यात १०० झेल आणि यष्टीचितचा समावेश आहे. त्याच्या पुढे कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिक आहे. त्याने यष्टीरक्षक म्हणून १०० झेल घेतले आहेत. कार्तिकने १८६ आयपीएल सामन्यांमध्ये एकूण १३३ बळी घेतले आहेत. त्यापैकी १०३ झेल आणि ३० यष्टीचित आहेत. तिसर्या क्रमांकावर आरसीबीचा पार्थिव पटेल आहे. पार्थिवने आयपीएलमध्ये ६६, तर नमन ओझाच्या खात्यात ६५ झेल आहेत.
यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीच्या फॉर्मबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंतच्या पाच सामन्यांच्या चार डावांमध्ये त्याने ९१ धावा केल्या आहेत. आयपीएलचा अठरावा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात खेळला गेला. या सामन्यात एकही बळी न गमावता चेन्नईने आपली या हंगामातील पराभवाची मालिका खंडित करत पंजाबवर विजय प्राप्त केला. पंजाबने दिलेल्या १७९ धावांचे आव्हान चेन्नईच्या सलामीवीर जोडीने अर्थात फाफ डु प्लेसिस आणि शेन वॉटसनने पूर्ण केले. चेन्नईने १७.४ षटकांत नाबाद १८१ धावा केल्या. शेन वॉटसन हा या सामन्याचा मानकरी ठरला.