दुबई - दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आज आयपीएलचा १४वा सामना रंगत आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंतच्या तीन सामन्यांपैकी दोन सामने गमावले असल्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मैदानावर पाऊल ठेवताच एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.
भारताचा दिग्गज माजी कर्णधार धोनी आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळलेला खेळाडू ठरला आहे. धोनीने यापूर्वी आयपीएलमध्ये १९३ सामने खेळले आहेत. त्यामुळे सनरायझर्सविरुद्धचा सामना हा त्याच्या आयपीएल कारकिर्दीचा १९४वा सामना आहे. चेन्नईचा स्टार फलंदाज आणि यावर्षी आयपीएलमधून माघार घेतलेल्या सुरेश रैनाने १९३ सामने खेळले आहेत.
धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने २०१०, २०११ आणि २०१८ या वर्षी आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. २००८पासून सुरू झालेल्या या लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जने आठ वेळा अंतिम फेरी गाठली आहे. २०१६ आणि २०१७मध्ये धोनी रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा भाग होता. स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे दोन वर्षासाठी चेन्नईच्या संघावर बंदी आली होती.
धोनीने १९३ आयपीएल सामन्यात ४४७६ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांमध्ये तो पहिल्या पाच खेळाडूंमध्ये आहे. धोनीने या स्पर्धेत आतापर्यंत २३ अर्धशतके ठोकली आहेत.